नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : सिडकोची ओसंडून वाहणारी तिजोरी पाहून सिडकोची गणना ही नेहमी श्रीमंत महामंडळात केली जाते. परंतु अलीकडच्या दशकात हा नावलौकिक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे. सजग नागरिक मंच नवी मुंबईला माहिती अधिकारातून प्राप्त माहिती अन्वये आर्थिक वर्ष २०१५ ते आर्थिक वर्ष २०२४ या कालावधीत सिडकोच्या मुदत ठेवीत सुमारे २३२४ कोटी रुपयांची घट झालेली दिसून आलेली आहे.
सजग नागरिक मंच नवी मुंबईने सिडकोच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे २५ एप्रिल २०२५ रोजी आरटीआय दाखल करत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२५ कालावधीतील सिडकोच्या मुदत ठेवींचा आर्थिक वर्षा निहाय तपशील , सदरील आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरीस असलेल्या ठेवींचा तपशील , सदरील आर्थिक वर्षात नव्याने केलेल्या मुदत ठेवींचा तपशील , मुदत ठेव मोडली असल्यास त्या मागची विस्तृत कारणमीमांसा अशा प्रकारची माहिती मागविणारा अर्ज दाखल केला होता. त्यास विहित कालावधीत कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद प्राप्त न झाल्याने मंचाने ४ जुलै रोजी प्रथम अपील दाखल केले होते.
या प्रथम अपिलाच्या अनुषंगाने प्राप्त माहितीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२४ या नववर्षाच्या कालावधीत सिडकोच्या मुदत ठेवीत तब्बल २३२४ करोड ( २३२९.९७) रुपयांची घट झाल्याचे दिसून आलेले आहे . सन २०२०_२१ या आर्थिक वर्षात सर्वात मोठी २६०२ करोडची घट झालेली दिसते. सन २०२४_२५ चे लेखापरीक्षा न झाल्यामुळे या कालावधीतील मुदत ठेवी संदर्भातील माहिती उपलब्ध नसल्याची माहिती सहाय्यक लेखा अधिकारी (वित्त) यांनी दिली आहे.मुदत ठेव मोडण्या मागचे कारण माहिती अधिकारात विचारले होते त्यास उत्तर देताना ” यूटी लाइज फॉर कॅश फ्लो पर्पज ” असे नमूद करण्यात आलेले आहे. वस्तुतः गेल्या दशकभराच्या कालावधीत सिडकोने मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्री केलेली आहे. त्यामुळे सिडकोच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर भर पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तिजोरीत घट होत असल्याचे दिसून येते आहे. सिडकोणे काही मोठे प्रोजेक्ट हाती घेतले असले तरी सिडकोतील आर्थिक अनागोंदी लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिजोरीत घट होण्या मागचे नेमके कारण जनतेच्या शंका निरसनार्थ अधिकृतपणे जनतेसमोर येणे निकडीचे आहे अशी मागणी मंचाचे सदस्य प्रमोद महाजन यांनी केली आहे.
सिडको हे शासकीय महामंडळ असल्याने सिडकोच्या कारभारात पारदर्शकता अभिप्रेत असताना सिडकोचा एकूणच प्रशासकीय दृष्टिकोन हा गुप्त कारभार पद्धतीकडे असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळेच कुठल्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी नागरिकांना वारंवार पाठपुरावा करण्याची वेळ येते आहे. सिडको ने आपल्या आर्थिक लेखाजोखा बाबत श्वेतपत्रिका जाहीर करायला हवी,असं नवी मुंबई सजग नागरिक मंचाचे सदस्य दौलत पाटील म्हणाले आहेत.