
नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीत 4 निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडला घटनास्थळी पोहोचायला विलंब झाला, कारण होतं गल्लीबोळांत अनियंत्रित पार्किंग. या बेशिस्त पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत शिरण्याचा मार्गच नव्हता. ही दुर्घटना केवळ अपघात नसून, शहरातील वाहन व्यवस्थेतील अराजकतेचे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे.
रस्त्यांवर गाड्यांचा कब्जा आपत्कालीन सेवांचा जीवघेणा अडथळा कारणीभूत ठरला. वाशी, ऐरोली, नेरूळ, घणसोली,कोपरखैरणे आणी कामोठे, पनवेल, उलवे या परिसरांमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहनं उभी केलेली दिसतात. काही ठिकाणी भंगार गाड्यांचा ढिगारा आणि काही ठिकाणी घराबाहेर कायमस्वरूपी पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीसाठी रस्तेच शिल्लक राहिले नाहीत. या बेशिस्त पार्किंगमुळे फायर ब्रिगेड आणि ॲम्बुलन्स सारख्या आपत्कालीन अत्यावश्यक सेवांना वेळेवर पोहोचणं जवळजवळ अशक्य होत आहे.
खरंतर ‘सिस्टम’लाच लागली आहे आग! महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे.
नियम असूनही बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई होत नाही, आणि परिणामस्वरूप निष्पाप नागरिकांना जीव गमावावे लागतात. “आजचे बळी हे केवळ अपघाताचे नाहीत, तर निष्काळजी प्रशासनाचे परिणाम आहेत,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नागरिकांनीही जबाबदारी घ्यायला हवी…
अशी बिकट परिस्थिती पुन्हा आलीच तर नागरिकांनी देखील तितकीच महत्त्वाची भूमिका घ्यायला पाहिजे. गल्ल्यांमध्ये किंवा अरुंद रस्त्यांवर वाहन पार्क करताना प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की, उद्या कुठे आग लागली, अपघात झाला, किंवा एखाद्याला ॲम्बुलन्सची गरज पडली तर त्या गाड्यांना मार्ग मिळणं गरजेचं आहे. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने तत्काळ सहकार्य करून रस्ता मोकळा करणे, वाहन हलवून देणे आणि एकमेकांना मदत करणे हे कर्तव्य आहे. या क्षणी आपली जबाबदारी ओळखणं हेच खऱ्या अर्थाने मानवतेच्या दृष्टीने शहराचं सुरक्षाकवच ठरू शकतं.
प्रशासनाला जाग येईल का?
घटनेनंतर अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील गल्लीबोळांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, काही ठिकाणी अशी स्थिती आहे की रिक्षा सुद्धा जाऊ शकत नाही.या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, तसेच शहरातील रस्त्यांवर अनेक दिवसांपासून धुळखात पडलेल्या भंगार गाड्यांची विल्हेवाट लावणे, पार्किंगसाठी नियोजन करणे आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई ही आधुनिक आणि नियोजित शहर म्हणून ओळखल जाणार शहर आहे. परंतु या घटनेने हे स्पष्ट झालं आहे की, नियम केवळ कागदावर असले तरी पुरेसं नाही. प्रशासनाने नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि नागरिकांनी शिस्त पाळावी. हाच या आगीमधून मिळणारा खरा धडा आहे असं म्हणता येईल.