
NCP MLA Sunil Shelke targets BJP in Local Body Elections 2025
Maharashtra Politics : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव मावळमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. वडगाव मावळमध्ये महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचे दिसून आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून यामुळे वेगळीच निवडणुकीची रंगत दिसून येत आहे. वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपवर थेट आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती करत वातावरण तापवले आहे. एका प्रबळ सभेत बोलताना त्यांनी भाजपकडून पैशांच्या बळावर उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला.
भाजपच्या एका महिला उमेदवाराचा दाखला देत आमदार सुनील शेळके म्हणाले, “अचानक एका महिला उमेदवाराला राजकारणात का आणले? ‘गुलाब काकांकडे लय माल आलाय’ म्हणून उमेदवारी दिली का? पैशांच्या जोरावर उमेदवार ठरवणार्या पक्षाकडून शहराचा विकास कसा अपेक्षित?” या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुती म्हणून राज्यामध्ये एकत्र लढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार सुनील शेळके यांनी पुढे सांगितले की, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वडगावसाठी मोठा निधी आणला असून नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व सार्वजनिक प्रकल्पांसाठी कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आम्ही दिलेल्या आश्वासनांनुसार तीन वर्षांत कामे पूर्ण केली नाहीत, तर पुन्हा आमदारकीसाठी मत मागायला येणार नाही,” असे खुले आव्हान देत त्यांनी राजकीय प्रामाणिकतेचा मुद्दा उठवला. यामुळे वडगाव मावळच्या राजकारणामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसत आहे.
जोरदार राजकीय वाद
जनतेला थेट संदेश देताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, “काम करतो मत द्या, काम नाही केलं तर घराच्या बाहेर ठेवा.”
यातून आगामी निवडणूक विकास विरुद्ध पैशांची ताकद या मुद्द्यावर लढली जाण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या या विधानांमुळे वडगावातील राजकारणात तापमान चढत असून पुढील काही दिवसात आरोप-प्रत्यारोपांतून निवडणूक रंगतदार होणार, असे स्पष्टपणे दिसून आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रचाराला जोरदार सुरुवात
वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच पक्षांचा प्रचार वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य जल्लोषात शुभारंभ झाला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे यांच्यासह सर्व 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत प्रचारयात्रेला प्रारंभ केला. यानंतर पंचमुखी मारुती मंदिरापासून पंचायत समिती चौकापर्यंत भव्य पायी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, पक्षाचे झेंडे, घोषणाबाजी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला. स्त्री-पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी हजेरी पाहायला मिळाली.