वडगाव मावळमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती झाली आहे् (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Election : वडगाव मावळ : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी बिनसलं तर काही ठिकाणी युती कायम राहिली आहे. पुण्यामध्ये चक्क राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र लढणार असल्याचे समोर आले आहे.
लोणावळा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शुक्रवारी रात्री लोणावळ्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते. दीर्घ चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला तोंड देण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला संयुक्त पाठिंबा देण्यास बैठकित एकमताने संमती दिली. तसेच प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. गावगाड्यातील अनावश्यक संघर्ष टाळावा, परस्परांमध्ये एकोपा राखावा आणि लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आमदार शेळके यांनी नमूद केले. नागरिकांच्या हितासाठी आणि स्थिर विकास आराखड्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, लोणावळा शहरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत आमदार सुनील शेळके यांनी भाजप व्यतिरिक्त इतर बलाढ्य नेत्यांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयानंतर भाजपला निवडणुकीत एकाकी पाडण्यात आमदार शेळके यशस्वी झाल्याचे स्पष्ट चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे. या नव्या समीकरणामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची व रंगतदार होण्याची चिन्हे असून आगामी काही दिवसांत आणखी राजकीय हालचाली वेग घेतील, अशी अपेक्षा आहे.
नगराध्यक्षपदासाठी ‘म्हाळसकर विरुद्ध ढोरे’ ?
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्जांचा अंतिम दिवस प्रचंड राजकीय ऊर्मीने पार पडला. आज अखेर एकूण ८९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्यानंतर वडगावातील राजकारण अक्षरशः तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ८२ अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रमुख राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा या पदावर लागणार आहे.म्हाळसकर कुटुंबातील मृणाल गुलाबराव म्हाळसकर (२ अर्ज), सुनंदा गुलाबराव म्हाळसकर, सायली रुपेश म्हाळसकर या तिघींनी दाखल केलेल्या अर्जांमुळे घराण्यातील अंतर्गत शक्तीपरीक्षेची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.






