NCP Vardhapan Din: "लोकसभेला फटका बसल्यानेच..."; वर्धापन दिनी अजित पवारांचे मोठे वक्तव्य
NCP Vardhapan Din : आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) चा वर्धापन दिन सुरू आहे. या वर्धापन दिनाला पक्षाचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी अजित पवार काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
कार्यकर्त्यांना संबोधित करता अजित पवार म्हणाले, “काही जन विचारतात तुम्ही भाजपसोबत गेलात.आपला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर गेलो होतो की नाही? तेव्हाही तडजोड केली होती. शेवटी विरोधी पक्षामध्ये बसून, आंदोलन, मोर्चे करून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण लोकांना दिशा दाखवणारे, लोकांची कामे करणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आहोत.”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “आपण ज्या वेळेस भाजपसोबत म्हणजेच एनडीए सोबत जायच ठरवले. राज्यात महायुती सोबत जायचे ठरवले. आज अनेक जण एनडीए सोबत आहेत. शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विविध योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत.”
“आपले सरकार आल्यापासून काही जण जाणीवपूर्वक आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक न्याय विभागाचा निधी कमी केला असे विधान कोणीतरी केले. माझ्या सर्व सहकाऱ्यांना विचारा की, यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना महायुतीच्या सरकारने मागच्या वर्षीच्या बजेटपेक्षा निधी वाढवून दिला आहे.”
“आपला लोकसभेला दारुण पराभव झाला. चारच खासदार निवडून आल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाले. लोकसभेला फटका बसल्यावर आम्ही सर्वांनी चर्चा केली. तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली. राजकारणात जनतेची नाडी ओळखता आली पाहिजे. अजित पवार पैसे सोडत नाही असे, काहीजण बातम्या उठवतात. मी काय खिशात पैसे घेऊन बसलोय का?”, असे अजित पवार म्हणाले.
“पक्षाचे काही कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. काही कारणामुळे हे प्रमुख नेते आज येऊ शकले नाहीत. नेहमीच महिलांना सन्मान देण्यासाठी काम केले. आता पुढील निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा. आपली जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस हा राज्याचा आणि देशाच्या हिताचा विचार करतो. लोककल्याणाचा ध्यास आपण घेतला आहे. सत्ता येईल आई सत्ता जाईल, कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. सत्तेवर असलो तरी आणि नसलो तरी आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे. ही लढाई विचारांची आहे. विचारांसाठी आहे, ती विचारांनीच लढावी लागणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले.