मुंबई : लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना महायुतीमध्य़े जागावाटपांवरुन गुंता निर्माण झालेला आहे1`. भाजपने यादी जाहीर करत काही नेत्यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र अनेक जागांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. दरम्यान, अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूकीसाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली. मात्र तरीही बारामती जागेबाबत सस्पेंन्स कायम आहे.
लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी रायगड मतदार संघातील उमेदवार जाहीर केला. रायगड लोकसभा मतदार संघासाठी महायुतीमध्ये चढा ओढ सुरु होती. मात्र आता हा तिढा सुटला असून अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवण्यात आले आहे. सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे लोकसभा निवडणूकीचे पहिले उमेदवार ठरले आहेत.
इतर जागा 28 तारखेला जाहीर होणार
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, आढळराव पाटील आज सायंकाळी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. 20 वर्षांनंतर पाटील यांचा शिरूरमध्ये पक्षप्रवेश होत आहे. शिरूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. बाकीच्या जागा 28 तारखेला जाहीर करण्यात येईल. महायुतीच्या जागा वाटपाबाबत व्यवस्थित मार्ग काढला जाईल. 99 टक्के काम पूर्ण झालं असून युतीतील मित्र पक्षांनी जागा वाटपाबाबत सहकार्य केले असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीत तुमच्या मनातील नाव होणार जाहीर
त्याचबरोबर माध्यमांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये त्यांच्या पक्षाला एकूण किती जागा मिळाल्या याबाबत विचारणा केली मात्र अजित पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. “राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतात, कारण नसताना अशी चर्चा पसरवली गेली. मात्र कार्यकर्त्यांचं समाधान होईल तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करू. बारामतीत तुमच्या मनात ज्यांच नाव आहे, त्यांच नाव जाहीर होणार आहे,” असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे बारामती मतदार संघाबाबत अजूनही उत्सुकता कायम राहिली आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे
त्याचबरोबर अजित पवार यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकांची राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार विधानसभा आणि मंत्री लोकसभा निवडणुकीत काम करतील. स्टार प्रचारक म्हणून लवकरच जाहीर करू, हे सर्व महायुतीचेच प्रचारक असतील. तर निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे असतील,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.