
मतदान करा अन् ५ टाटा सिएरा जिंका; निखिल काळकुटे मित्र परिवाराची अनोखी संकल्पना
पिंपरी : महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय नेते जोरदार तयारी करत आहेत. अशातच आता आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील निखिल काळकुटे मित्र परिवाराने एक अत्यंत आकर्षक आणि अनोखी संकल्पना राबवली आहे. ‘मतदान हा आपल्याला लाभलेला सर्वोच्च अधिकार आहे’ या भावनेतून सर्वांनी विक्रमी मतदान करावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
संकल्पना काय आहे?
निखिल काळकुटे मित्र परिवाराने जाहीर केल्यानुसार, जे मतदार मतदान करून आपला हक्क बजावतील, त्यांच्यासाठी एका विशेष ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘लकी ड्रॉ’ची अट अशी आहे की, निखिल काळकुटे व त्यांच्या सुविद्य पत्नी इंद्रायणी निखिल काळकुटे निवडणुकीत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास, हा ‘लकी ड्रॉ’ काढला जाईल.
बक्षीस काय आहे?
या अनोख्या संकल्पनेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘लकी ड्रॉ’च्या विजेत्याला देण्यात येणारे भव्य बक्षीस.. विजेत्या मतदाराला टाटा कंपनीने नव्यानेच लॉन्च केलेल्या पाच भाग्यवंत मतदारांना प्रत्येकी एक ‘सिएरा’ (Tata Sierra) ही नवी कोरी गाडी भेट म्हणून देण्यात येणार आहे.
सर्वत्र जोरदार चर्चा
या संकल्पनेची सध्या शहरात सर्वत्र ‘जाम’ चर्चा आहे. ही अनोखी शक्कल मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत खेचून आणण्यासाठी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निखिल काळकुटे मित्र परिवाराने मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेला एक आकर्षक वळण देत, नागरिकांना आपला हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.