"अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ..."; अतिवृष्टीबाबत मंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश
1. अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
2. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
3. राज्याला मुसळधार पावसाने झोडपले
Maharashtra Rain Update: राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भगत मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मुसळधार पावसाचा फटका मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसला आहे. याबाबत आज मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्यव्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.
मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय अकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान आठ ते दहा तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा, असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
Nitesh Rane: “ए आय तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा…”; मंत्री नितेश राणेंची माहिती
शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत तात्काळ करावी
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या प्रचंड नुकसानीसाठी केंद्र सरकारने किमान १०,००० कोटी रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करावी आणि त्या खात्यांमधून बँकांनी कर्जहप्ते वळती करून घेऊ नयेत, यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. पंचनामे आणि नियमांच्या तपासणीमध्ये वेळ घालवू नये, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळेल याकडे लक्ष द्यावे, असही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.