आता लोणावळ्याला न जाताच पोहोचता येणार पुण्याला
मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरांदम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. रेल्वे प्रवासादरम्यानच्या लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कर्जत ते तळेगाव (72 किमी), कर्जत ते कामशेत (62 किमी) आणि कर्जत ते मळवली हे तीन नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला आहे. या नव्या मार्गामुळे मेल-एक्सप्रेस लोणावळ्याला न जाता थेट पुण्याला जातील.
गाड्यांचा वेग वाढणार असल्या कारणाने जादा गाड्या चालविणे रेल्वेला शक्य होणार असून प्रवास वेळेत एक तासाची बचत होणार आहे. हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. मुंबई ते पुणे हे 192 किमीचे अंतर असून, या मार्गावर एकूण 44 रेल्वे धावतात. त्यापैकी 23 गाड्या या रोज धावणाऱ्या आहेत. मुंबई ते पुणे रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट लागतो.
दरम्यान, प्रवासी सुरक्षिततेमुळे घाटात ताशी 60 किमी अशी वेगमर्यादा मेल-एक्स्प्रेसला आहे. लोणावळा-खंडाळा घाटात जाण्यापूर्वी आणि घाट उतरल्यानंतर कर्जत स्थानकात मेल-एक्सप्रेसला बँकर (अतिरिक्त इंजिन) जोडला होता.
गाड्यांचा वेग वाढणार अन् वेळेची बचतही होणार
हा प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे नवीन मार्गाची चाचपणी करत आहे. कर्जत ते तळेगाव, मळवली आणि कामशेत दरम्यान घाट नसल्याने गाड्या ताशी 110 किमीच्या वेगाने धावू शकतील. कर्जत ते तळेगाव दरम्यान 72 किमीच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रेडियंट (चढ-उताराची तीव्रता) होईल. सध्या लोणावळा घाटात 1.37 ग्रेडिएंट आहे. यामुळे बँकर जोडण्याची आवश्यकता लागणार नाहीत. तसेच सरळ मार्गामुळे गाड्यांचा वेग वाढणार असल्याने मुंबई-पुणे प्रवासात किमान एक तासाची बचत होईल.
अपेक्षित खर्च किती?
प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. कर्जत ते तळेगाव नव्या मार्गासाठी 16 हजार आणि कर्जत ते कामशेत मार्गासाठी 10200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.