
Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल
… म्हणून आमच्यापासून सुरुवात केली!
‘ग्रामीण भागात इलेक्ट्रिक स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी एक झाड सर्व विधी करताना जाळलेच जाते. साहजिकच हवेचे प्रदूषण होतेच. शिवाय त्यानंतर ती राख पाण्यात टाकल्याने पाणी प्रदूषणही होते. ही राख झाडांना टाकल्याने जाळले गेलेले एक झाड दुसरीकडे वाढवल्याचे समाधान आणि जलप्रदूषण रोखण्यातही हातभार लागेल. हे कार्य दुसऱ्या कुणाला सांगून होणार नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्यापासूनच सुरुवात केली,’ अशा भावना सरूबाईंचे पुतणे उद्धव लोहोट यांनी व्यक्त केल्या.
अंत्यसंस्कारानंतरची राख पाण्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. अनेकांच्या अंत्यसंस्कारप्रसंगानंतर हे दृश्य पाहून यामुळे किती जलप्रदूषण होत असेल, याबाबत चिंता वाटायची. हीच राख झाडांच्या मुळांशी टाकली, तर त्यांनाही खत म्हणून तिचा वापर होईल, जलप्रदूषण रोखण्यासही हातभार लागेल. या विचाराने आमच्या आईच्या निधनानंतर आम्ही ती राख झाडांना टाकण्याचा निर्णय घेतला.
– गणपतराव लोहोट, मुलगा