Mumbai-Pune Highway: जुना मुंबई-पुणे महामार्ग अंधारात! देहूरोड ते वडगाव फाटा दरम्यान पथदिवे बंद; अपघाताचा धोका वाढला
या महामार्गावरून दररोज सुमारे हजारो प्रवासी, अवजड व्यावसायिक वाहने आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, रात्रीच्या वेळी पडणारे धुके आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दृश्यमानता (विझिबिलिटी) कमालीची कमी होते. त्यातच पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना केवळ स्वतःच्या वाहनांच्या मुख्य प्रकाशझोतावरच (हेडलाईट) चाचपडत वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, जराशी नजर सुटल्यास भीषण अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावरील पथदिवे काही दिवसांपासून नव्हे, तर चक्क वर्षानुवर्षे बंद आहेत. काही मोजक्या ठिकाणी दिवे सुरू असले तरी त्यांची प्रकाश योजना अत्यंत अपुरी आणि मंद आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाच्या दुतर्फा अनेक मोठ्या रहिवासी वस्त्या, नामांकित शैक्षणिक संस्था आणि महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. दररोज हजारो विद्यार्थी, कुटुंबे आणि भाविक या मार्गावरून ये-जा करतात. असे असतानाही, “हे पथदिवे वारंवार बंद का राहतात? आणि त्यांच्या देखभालीची जबाबदारी कोणाची?” असे संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
वास्तविक पाहता, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या महामार्गावरील सर्व पथदिव्यांची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, स्थानिक प्रशासन आणि संबंधित रस्ते विकास विभाग यांच्यातील परस्पर समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला आहे. शासकीय विभागांच्या या ढिसाळ कारभारामुळे रात्रीच्या वेळी या प्रमुख महामार्गावरून प्रवास करणे आता अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे बनले आहे.
पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध झाल्यास केवळ रस्ते वाहतूकच सुरक्षित होणार नाही, तर अंधाराचा फायदा घेऊन महामार्गालगत होणाऱ्या चोऱ्या, लूटमार आणि इतर अवैध कृत्यांनाही मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांना सुरक्षित आणि प्रकाशमय रस्ता उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि रस्ते विभागाने तातडीने समन्वय साधून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी चाकण आणि तळेगाव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.






