पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह (Pimpri-Chinchwad City) लगतच्या भागाला शिवनेरी जिल्हा (Shivneri District) म्हणून नाव द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे बोलत होते.
विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी-चिंचवडच्या बाजूच्या भागाला जिल्हा म्हणून शिवनेरी नाव द्यावं अशी मागणी केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहराला पोलिस आयुक्तालय मिळाले. तशीच आणखी एक मागणी असल्याचे सांगत पुणे जिल्ह्याचं विभाजन करत पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूच्या परिसराला (भागाला) शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावं, अशी मागणी केली. राजकीय विभाजन नाही, केवळ जिल्ह्याचे विभाजन म्हटलं आहे. उगाच वेगळ्या बातम्या चालवू नका, असंही लांडगे म्हणाले.
आमदार लांडगे म्हणाले की, शहराच्या स्थापनेपासून एकच पवना धरणाचा स्त्रोत होता. त्यानंतर 52 वर्षांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दुसरा स्त्रोत निर्माण झाला. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पामुळे शहर पाण्याबाबत आत्मनिर्भर होणार आहे. मोशीमध्ये १९७२ पासून कचरा टाकला जात होता. त्यामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’सारखा प्रकल्प फडणवीस यांच्याच सत्ताकाळात हाती घेतला.
महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस काम करताहेत
समाविष्ट गावांमध्ये २०१७ ते २०२३ मध्ये जी विकासकामे झाली, ती गेल्या २० वर्षांत झाली नव्हती. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस दूरदृष्टीने काम करीत आहे. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाला मंजुरी मी स्थायी समिती सभापती असताना दिली होती. स्थानिक नगरसेवकांनी या कामासाठी पुढाकार घेतला. त्या नाट्यगृहाचे उद्घाटन आज होत आहे, याचे विशेष समाधान वाटते, असेही त्यांनी म्हटलं आहे.