PMPML च्या ताफ्यात दाखल होणार आणखी एक हजार बसेस; संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : पीएमपीएमएल आणखी एक हजार बसेस घेणार आहे. यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बस खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता याबाबतचा निर्णय घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे.
बस खरेदीसाठी राज्य सरकारने आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पीएमपीएमएलने राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होणार नसल्याचे कळवण्यात आले होते. यामुळे पीएमपीएमएलची सेवा असणाऱ्या पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडी) या संस्थांनी एकत्रितपणे या बसेस खरेदी कराव्यात, असा निर्णय घेतला गेला.
हेदेखील वाचा : Ambabai and Jotiba temples: देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ मंदिरात आजपासून ड्रेसकोड लागू
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 250 बसेस खरेदी करणार आहे. तर पीएमआरडीएकडून पाचशे बसेसची खरेदी केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त भोसले यांनी सांगितले. यापूर्वी पाचशे बसेस खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तेव्हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका बस खरेदी करणार असे या प्रस्तावात नमूद केले होते.
दरम्यान, आता पीएमआरडीएने देखील बस खरेदी करण्याची तयारी दाखवल्याने एक हजार बसेस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
बस बंद पडण्याचे वाढले प्रकार
पीएमपीच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत. बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एक हजार नवीन बस घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) 250 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशीही माहिती यापूर्वी दिली जात होती. त्यानंतर आता संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Pune News : मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर; महिनाभरापासून प्रस्ताव आयुक्तालयातच पडून