महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज (फोटो- istockphoto)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित भागात कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यात चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात प्रवेश केला. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे.
हेदेखील वाचा : पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट; ‘यावर्षीचा पाऊस धो-धो, कमी दिवसांत…’
मुंबई, ठाणे, कल्याणसह अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि बालूरघाटपर्यंत मान्सूनची सीमा स्थिर आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यामध्ये प्रचंड उकाडा वाढणार
राज्यातील हवामान अंशतः ढगाळ आहे. परंतु उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान ३९ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. चंद्रपूर येथे ३९.८ अंश तापमान नोंदवले गेले. मान्सून कमजोर झाल्याने पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर जून महिन्याच्या सुरवातीला राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, काही भागात पाऊस कायम असल्याचं देखील दिसून येत आहे. राज्यातील कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच इतरही काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेदेखील वाचा : पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका; 74 घरांसह अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान