बारामती : शहरातील बारामती बस स्थानकाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असताना बस स्थानकाच्या जागेवर आमचा मालकी हक्क अद्याप कायम असल्याचा दावा करत या जागेचे हस्तांतरण झाले नसल्याचे स्पष्ट करत मूळ जागा मालकांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या बस स्थानकाच्या समोर गेली ११ दिवसांपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे.
वंचितच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात उपोषण
वंचित बहुजन आघाडी पुर्व विभाग युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना निकाळजे म्हणाले, बारामती- बारामती मधील गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील जागेमध्ये एस टी महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एसटी बसस्थानकाचे काम चालू आहे. या जागेचा सात-बारा उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावर आहेत.
बारामती शहरात निषेध मोर्चा
या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन अथवा हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे. या संदर्भात १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण केले होते, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहरात निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता ;परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिशाभूलीची उत्तरे देण्यात आली असल्याने निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये दि ८ जानेवारी पासून बारामती बस्थानाकासमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन चालू आहे .या आंदोलनामधील मागण्या मध्ये गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मूळ मालकांना जागेचा पाच पट मोबदला देण्यात यावा.
बारामती बस स्थानकाला नाव देण्याची मागणी
गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मालकी हक्काच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन मालकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या नुसार करवाई करण्यात यावी.
बारामती बस्थानकाची जागा ही महार वतनी असल्याने या बसस्थानकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती स्थानकाला देण्यात यावे तसेच इतर मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
जो पर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तो पर्यंत बारामती बस स्थानाकाचे उद्घाटन करू देणार नाही व हे बेमुदत चक्री आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती मंगलदास निकाळजे यांनी दिली .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात,उपाध्यक्ष किरण मिसाळ, सचिव मंगेश लोंढे, सहसचिव कृष्णा साळुंके, शहर सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, आनंद जाधव जितेंद्र कवडे, मयूर सोनवणे, शिवाजी सोनवणे, कांता सोनवणे, कविता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Original owners claim to baramati bus station site vanchit bahujan yuva aghadis indefinite cycle dharne movement nryb