मोखाडा पोलिसांनी पकडली अफूने भरलेली क्रेटा; १५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
दीपक गायकवाड/मोखाडा: गुन्हेगारीवर कडक निर्बंध घालण्याचा निर्धार केलेल्या पालघर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकाने संशयास्पद हालचाली करणारी एक कार थांबवून तपासणी केली असता तिच्यामध्ये अफूने भरलेली पोती सापडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण १५ लाख ८० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २१ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. त्या वेळी मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर गस्त घालत असताना पोलिस अंमलदार बापू नागरे व पोलिस हवालदार शशिकांत भोये यांच्या निदर्शनास एक MP09CZ6669 क्रमांकाची क्रेटा कार भरधाव वेगाने जाताना आली. कारचा वेग आणि वळणावरून घाईने जाण्याची पद्धत पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी तात्काळ पाठलाग सुरु केला.
पोलिसांनी अत्यंत दक्षतेने पाठलाग करत मौजे चिंचूतारा गावाच्या हद्दीमध्ये कार थांबवली. मात्र, कारचालकाने अंधाराचा फायदा घेत गाडीची चावी घेऊन पळ काढला. घटनास्थळी कार थांबवून तिची तपासणी केली असता, तिच्यात अफूच्या बोंडाचा चुरा भरलेली पोती, बनावट क्रमांक प्लेट आणि इतर संशयास्पद सामग्री सापडली.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १ क्विंटल ११ किलो ४२० ग्रॅम अफूचा चुरा (किंमत ₹७,८०,३४०), HR36AC2410 आणि MH05DS2526 अशा दोन बनावट क्रमांक प्लेट्स तसेच ₹८ लाख किंमतीची क्रेटा कार असा एकूण ₹१५,८०,३४० चा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात गु. र. नं. ११९/२०२५ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम १५ (क), ८ (क) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे, पोलिस हवालदार भास्कर कोठारी, शशिकांत भोये, पंकज गुजर यांच्या संयुक्त पथकाने केली.
पोलिस अधीक्षक देशमुख यांनी जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याचे आदेश दिले असून, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांची ही दक्षता व तत्परता जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच आदर्श ठरते.