
"निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
पालघर नगर परिषदेसाठी शिवसेनेचे उत्तम घरत हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. पालघरमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल जेट्टीसंदर्भात स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही. पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतील, असे प्रकल्प होऊ देणार नाही. लोकांवर वरवंटा फिरवून विकास करणार नाही, असे ते म्हणाले. अडीच वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास केला तसेच लोकाभिमुख्य कल्याणकारी योजना राबवल्या, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अनेक अडथळे आले, मात्र ही योजना सुरु केली आणि ती पुढेही सुरुच राहणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. ज्यांनी सत्तेसाठी विचार सोडले आणि विकासाला विरोध केला त्यांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. लोकांना विकास हवाय म्हणून पालघरमध्ये सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या बाजूनं उभ राहण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
डहाणू येथे शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना ते म्हणाले की डहाणूची मागास तालुका अशी ओळख लवकरच पुसली जाईल, डहाणूत विकासाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. डहाणूतील मच्छिमारांचे प्रश्न, किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या घरांचा प्रश्न, युडीसीपीआर, वनपट्टे याविषयीचे प्रश्न सोडवले जातील.
विकासापासून वंचित डहाणूला पहिल्या क्रमांकाचा तालुका बनवू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. जव्हारमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार पद्मा राजपूत आणि शिवसेनेच्या पॅनलसाठी घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत. राज्यात सुरु झालेल्या कल्याणकारी योजना कदापी बंद होणार नाहीत. जव्हारच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. वाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्यावर शिवसेनेचेचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून हेमांगी पाटील निवडणूक लढवत असून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.