(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
घटनेची माहिती मिळताच महापौर अजीव पाटील यांनी नगरसेविका सुमन काकडे आणि नगरसेवक विनोद जाधव यांच्यासह रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती तपासणी केली जात आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक पाठवण्यात येणार असल्याची माहिती महापौर अजीव पाटील यांनी यावेळी दिली.
केकमुळे विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने प्रथम विजयलक्ष्मी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर केक खरेदी करण्यात आलेल्या चामुंडा केक शॉपची तपासणी करण्यात आली. दुकानातील केक व अन्य खाद्यपदाथांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालघर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी दिली.
संबंधित केक नेमका कुठून खरेदी करण्यात आला होता. तो तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि कैकमध्ये पाल कशी आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या तपासणीनंतरच केकच्या गुणवत्तेबाबत आणि रुग्णांच्या प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या सर्व ११ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.