(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बोईसर-तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाबाबत तक्रारी होत असतानाच अलीकडील पाहणीत काही उद्योगांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा बसवणे पुरेसे नसून ती प्रत्यक्षात कार्यरत आहे का, याची नियमित तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील प्रदूषणाबाबत यापूर्वीही विविध कारवाया झाल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर काही काळाने पुन्हा नियमभंगाच्या घटना समोर येत असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची परिणामकारकता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. नोटिसा, कारवाई आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन तारापूरमधील प्रदूषण प्रत्यक्षात किती कमी झाले, याचे मोजमाप करण्याची मागणी केली जात आहे.
स्टॅनसेओ एनव्हायरोच इंडिया प्रा. लि.च्या बाबतीत आवश्यक मंडळाची संमती न घेता दुसऱ्या इमारतीत नवीन प्लांट आणि यंत्रसामग्री बसवण्यात परवानगीही सादर करण्यात आलेली नसल्याचे नोटिसीत नमूद आहे.
इंडाको जीन्स प्रा. लि. व्या पाहणीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी भूमिगत पाइपलाइनच्या माध्यमातून बायपास करून सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून, संबंधित भूमिगत पाइपलाइन एमआयडीसीकडून डिस्कनेक्ट करण्यात आल्याचे मंडळाला आढळून आले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर सोडले जात असल्यास त्याचा परिसरातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विराज प्रोफाइल्स लिमिटेड युनिट-IIच्या पाहणीत बँग हाऊस परिसरातून मोठ्या प्रमाणावर धूळ उत्सर्जित होत असल्याचे आढळले. धुळीमिश्रित अल्कधर्मी पाणी स्टॉर्म वॉटरमध्ये मिसळत असल्याचेही मंडळाने नोंदवले आहे. काही स्क्रबर बंद स्थितीत असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. ईटीपी-बी आणि ईटीपी-सी कार्यरत नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. या उद्योगातील ईटीपीमधील पाण्याचा पीएच १० ते ११, तर धुळीमिश्रित स्टॉर्म वॉटरचा पीएच १० ते १२ आढळला. पाण्याच्या गुणवत्तेची ही स्थिती निर्धारित मानकांच्या तुलनेत चिंताजनक असल्याचे मंडळाच्या निरीक्षणातून उजेडात आले आहे.

