
बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज! ( सौजन्य - सोशल मीडिया )
जिल्ह्यातील वाडा, बोईसर, पालघर, डहाणू, मनोर आणि विक्रमगड या भागांत गणेशमूर्तीची संख्या मोठी आहे. वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७५ सार्वजनिक आणि १ हजार १५० घरगुती, तर बोईसर हद्दीत २३२ सार्वजनिक आणि २,१२५ घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध कालावधीत गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. मोठ्या मंडळांच्या गर्दीचे नियोजन, स्वयंसेवकांची मदत आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यावरही भर दिला जात आहे. गणेशोत्सव शांतता, सलोखा आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पालघर पोलीस दलाने विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिस अधिकारी व अंमलदारांसह होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आवश्यक ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग आणि विसर्जनस्थळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. घरगुती गणपतींसाठी मखर, सजावटीचे साहित्य, फुले आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे आगमन सोहळेही ढोल-ताशांच्या गजरात सुरू झाले आहेत. त्यामुळे बाप्पा घरात आणि मंडळात विराजमान झाल्यानंतर सगळीकडे आनंदीआनंद होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हा जल्लोष संपूर्ण वातावरणात पाहायला मिळणार एवढं नक्की.