
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
महसूल विभागाच्या पथकाने बोटीतील वाळू पुन्हा खाडीपात्रात टाकली, याचदरम्यान वाळू व दगडाची वाहतूक करणारे तीन हायवा ट्रकही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान फ्यकावर दबाव आणण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली. मात्र, दबावाला न जुमानता कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वैतरणा खाडीसह शिरगाव, जुली बेट, खानिवडे आणि पाचूबंदर परिसरात सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या कारवाईमुळे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वैतरणा खाडीत अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गौण खनिज पथकाला मिळाली. त्यानंतर नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. त्यावेळी सक्शन पंपाच्या सहाय्याने बोटीतून वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने तत्काळ बोट उद्ध्वस्त केली. दरम्यान, २०१४ मध्ये नारंगी येथील संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खाडीतील बेकायदा वाळू उपशाचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकाराला कायमचा आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी स्पष्ट केलं की, “नायब वैतरणा खाडीत बेकायदा चाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाई केली. सक्शन पंपाची बोट उद्ध्वस्त करून तीन हायवा जप्त केले. कारवाईदरम्यान दबाव आणि धमक्यांचा प्रयत्न झाला, तरीही पथकाने कारवाई थांबवली नाही. सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल कारवाईत आला आहे”.