
वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल ( सौजन्य - सोशल मीडिया )
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सध्या १२० बसेस असून, त्यापैकी ४० ई-बसेस आहेत. या बसेसद्वारे शहरातील ३८ मार्गावर दररोज सुमारे २२०० फेऱ्या चालवल्या जातात. या सेवेतून दररोज तब्बल ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अचानक बससेवा बंद पडल्याने शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम झाला. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी चालक आणि वाहकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यावेळी वेतनवाढीसह अन्य मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मात्र, गणेशोत्सव सुरू होत असतानाच पुन्हा काम बंद आंदोलन सुरू झाल्याने परिवहन सेवेतील समस्या कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बससेवा बंद असल्याने प्रवाशांना रिक्षा, खासगी वाहनांचा घ्यावा लागला. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असताना बससेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय आणखी वाढली.
गणेशोत्सवासाठी खर्च वाढलेला असताना ठेकेदाराने पूर्ण महिन्याचे वेतन देण्याऐवजी निम्मेच वेतन दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्ही पूर्ण महिना काम करतो. सणासुदीच्या काळात आमच्याही कुटुंबाला खर्च असतो. असे असताना अपुरे वेतन मिळाले तर संसार कसा चालवायचा?, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी स्पष्ट केलं की, “बससेवा पूर्ववत करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढून सेवा तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
आगार व्यवस्थापक किरण शेरेकर म्हणाले की “महापालिकेकडून विविध योजनांची देयके मिळालेली नसल्याने निधीची अडचण निर्माण होत आहे. तरीही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.”