दादांकडून खूप काही शिकण्यासारखंं; पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक
बारामती : बारामतीमध्ये शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला मत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना मुंडे म्हणाल्या, “एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.
हे सुद्धा वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन खासदार सोनवणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, हे सगळे आरोपी…
सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट
राजकीय टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या विरोधकांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध असल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर अवघ्या राज्याला माहितेय. बीड प्रकरणात या दोघींनीही एकमेकींविरोधात भूमिका घेतली. मात्र, बारामतीतील एका कार्यक्रमात एकमेकींना पाहिल्यावर दोघींनी कडकडून मिठी मारली. हस्तांदोलन केलं, क्षणभर गप्पाही मारल्या. हे सर्व खुल्या व्यासपीठावर झालं, जे अनेकांच्या कॅमेऱ्यातही कैद झालं. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार पंकजा मुंडे, क्रीडा-युवक-कल्याण-अल्पसंख्याक विका व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.