
Patan SIR News: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे. महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २० ते २९ जून या कालावधीत गणना प्रपत्रांची छपाई, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच अन्य पूर्वतयारीची कामे केली जाणार आहेत. ३० जून ते २९ जुलै 2026 या कालावधीत २६१ पाटण विधानसभा मतदारसंघातील ४२४ मतदान केंद्रांवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप करणार आहेत.
संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने हे प्रपत्र भरून द्यावयाचे असून त्यामधील माहितीच्या आधारे मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. भरलेली प्रपत्रे पुन्हा बीएलओंकडून संकलित केली जाणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही केले जाणार असून नवीन मतदान केंद्रांची निर्मिती, केंद्रांचे विलीनीकरण तसेच मतदान केंद्रांच्या नावात किंवा ठिकाणात आवश्यक बदल करण्यात येणार आहे.
२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा ३ ऑक्टोबरपर्यंत केला जाणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सन २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ९ हजार २२६ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ८५४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून हे प्रमाण ८८.५६ टक्के इतके आहे. मात्र अद्याप ३५ हजार ३७२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण होणे बाकी असल्याची माहिती टोम्पे यांनी दिली. सन २००२ मध्ये अन्यत्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची जुनी नोंद उपलब्ध न होणे तसेच विवाहानंतर सासरी आलेल्या महिला व नवविवाहितांकडून माहेरच्या मतदार यादीतील नातेवाइकांची माहिती उपलब्ध न होणे, ही मॅपिंग प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदारयादी शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी तातडीने संबंधित बीएलओंशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच कुटुंबातील मयत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मतदार यादीतील अचूकता वाढविणे आणि लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देणे हा या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश असून, सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.