विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी हातभट्टीची दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीने पाच विशेष पथके तयार केली आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड येथे २६ ते २८ मे या कालावधीत विषारी हातभट्टीची दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दापोडी व हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांची क्लोन कॉपीही प्राप्त केली जात आहे.
तसेच सर्व आरोपींच्या सीडीआर आणि आयपीडीआरचे विश्लेषण सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया देखील वेगाने सुरू आहे.
दरम्यान, विषारी दारू प्रकरणाबाबत नागरिकांकडे काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे. यासाठी दापोडी आणि हडपसर येथे दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी पुढे येऊन तपासाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
20 संशयितांच्या मार्गावर सीआयडी
विषारी दारू प्रकरणात आणखी २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळेच या संशयितांच्या शोधासाठी पाच विशेष पथके कार्यरत केली गेली आहे. आरोपींचे मोबाईल आणि डिजिटल पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सीडीआर, आयपीडीआरचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरु आहे. नागरिकांकडून माहिती मिळविण्यासाठी दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
राज्यात संतापाची लाट
दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या अनेक मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. त्याने रसायने आणि इंडस्ट्रियल स्पिरिट मिसळलेली विषारी दारू पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. पोलीस सध्या त्याची चौकशी करत असून संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.






