
मोठी बातमी! गारठ्याचा शाळांना फटका; वेळापत्रकात बदल, महापालिकेच्या शाळा आता...
पिंपरी: वाढती थंडी आणि हिवाळ्यात लवकर पडणारा अंधार लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार आता सर्व महापालिका शाळा सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
या बदलामुळे सकाळच्या तीव्र थंडीत विद्यार्थ्यांना लवकर बाहेर पडावे लागणार नाही, तसेच शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील. याशिवाय, वेळेतील बदलामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळून उपस्थिती वाढण्यास व शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश, तर माथेरानमध्ये १७ अंश इतकी नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून येथे पारा ६.६ अंशांवर घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद याच जिल्ह्यात झाली आहे.Maharashtra Weather News update: राज्यात नुसती हुडहुडी अन् कुडकुडी! अनेक शहरांत तापमान १० अंशांखाली
पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.