
धरण उशाला अन् कोरड घशाला! भामा-आसखेड योजनेला 2027 चा मुहूर्त
सात वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पार गेली असून, वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या सात वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहराला पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रातून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून २० ते ३० एमएलडी असा एकूण सुमारे ६३०-६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, हा पुरवठा अपुरा ठरत असल्याने खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन गेल्या पाच वर्षांपासून कागदावरच आहे.
ठेकेदाराचा निष्काळजीपणा की तांत्रिक अडचणी?
भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत अशुद्ध जलउपसा केंद्रापासून (जॅकवेल) ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एकूण २६.१० किमी अंतराची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
मूळ मुदत : नोव्हेंबर २०२४ मध्ये काम संपणे अपेक्षित होते.
सद्यस्थिती : मार्च २०२६ पर्यंत दुसरी मुदतवाढ देऊनही केवळ ६५ टक्के (१२.४५ किमी) काम पूर्ण झाले आहे.
खर्च : ६१ कोटी १८ लाख रुपयांच्या या प्रकल्पावर आतापर्यंत ३३ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाले आहेत.
आयुक्तांसमोर सुनावणी पूर्ण
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाची सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान ठेकेदाराने वाढीव दराची आणि पुन्हा मुदतवाढीची मागणी केली. मात्र, विभागाने कामातील दिरंगाई पाहता कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने आता या ठेकेदाराचा करार रद्द करून उर्वरित कामासाठी नवीन निविदा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : ही दोस्ती तुटायची नाय…; शाळकरी मित्र नगरपालिकेच्या सभागृहात एकत्र दिसणार
आंद्रा पाणी योजनाही ‘हवेतच’
दुसरीकडे, आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी आणण्याचा मूळ प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. सध्या निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यातून तात्पुरत्या स्वरूपात ९० एमएलडी पाणी उचलले जात आहे. मात्र, नदीचे पाणी दूषित असल्याने त्याच्या शुद्धीकरणासाठी निगडी जलशुद्धीकरण केंद्राच्या तुलनेत दुप्पट खर्च करावा लागत आहे. थेट धरणातून पाणी आणण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
भामा-आसखेड पाईपलाईनचे काम रखडलेले आहे. विभागाकडून ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित ठेकेदाराने सुनावणीत त्याची बाजू मांडली आहे, मात्र काम वेळेत पूर्ण झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता नवीन ठेकेदार निश्चित करून यावर काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वाटत आहे. — श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका.