पिंपरी महापालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर; अभियंत्यासह ३९ जणांवर एसीबीची कारवाई
तक्रारदार ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ओंभासे यांनीच नव्हे तर सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनीही करारनाम्यावर सही करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारीत त्यांचा स्पष्ट उल्लेख असल्याने आता एसीबीचा फास सूर्यवंशी यांच्यावरही आवळला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम
निविदांचे प्रस्ताव तयार करण्यापासून ते कामांची बिले मंजूर करणे, मर्जीतील ठेकेदारांसाठी अटी-शर्ती शिथिल करणे आणि अंतिम कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) देणे या प्रत्येक टप्प्यावर महापालिकेत ‘टक्केवारी’ ठरलेली असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. “खिसा गरम केल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही,” अशी पालिकेच्या कारभाराची स्थिती झाली आहे. यापूर्वीही पाणीपुरवठा विभागातील अनुरेखक दिलीप आडे याला कामाचा आदेश देण्याची फाईल पुढे पाठवण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
महापालिकेत १७ फेब्रुवारी १९९७ ते आजअखेरपर्यंत तब्बल ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचखोरीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांच्या चार कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. गेल्या नऊ वर्षांच्या (एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०२६) कालावधीत एसीबीच्या जाळ्यात अडकून तब्बल १८ जणांनी तुरुंगाची वारी केली आहे. यामध्ये थेट तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकापासून (पीए) ते बीट निरीक्षक, मुख्याध्यापक, सर्व्हेअर आणि कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
१२ मार्च २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२६ या प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने लाचखोरीच्या प्रवृत्तीने कळस गाठला होता. या चार वर्षांच्या काळात तब्बल ६ अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. अधिकाऱ्यांच्या निर्ढावलेल्या भूमिकेमुळे पालिकेच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे आरोप महापालिका सभेत वारंवार होत आहेत.
६ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर तरी लाचखोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती; मात्र नव्या सत्ताकाळातील अवघ्या नऊ महिन्यांतच ३ जण जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये मुख्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आणि करसंकलन विभागाच्या एका लिपिकाचा समावेश आहे.






