Vaishali Kadam Reveals: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))
Arun Kadam Wife On House Left : मराठी इंडस्ट्रीत अरुण कदम हे नाव सगळ्यांनाच माहित आहे. कॉमेडी असो किंवा सीरिअस भूमिका, त्यांनी नेहमीच लोकांना हसवलंय. पण कामापेक्षा जास्त ते त्यांच्या खऱ्या आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांची पत्नी वैशाली कदम या सिनेमात काम करत नाहीत, पण सोशल मीडियावर त्या चांगल्याच फेमस आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नवीन घराचा एक भारी किस्सा सांगितला आहे. Vaishali Kadam Reveals:
वैशाली यांनी सांगितलं की मी आधी पूर्णवेळ हाऊस वाईफ होते. पण घरी बसून पण मी शेअर मार्केट बघायचे. थोडे थोडे पैसे गुंतवत गेले आणि त्यातून मला चांगला नफा मिळाला. हळूहळू अजून पैसे गुंतवावेसे वाटले. आम्ही खारमध्ये जे घर घेतलं, ते याच पैशातून घेतलं आहे. त्यात अरुणचे अर्धे पैसे आणि माझे अर्धे पैसे आम्ही लावले होते.आम्ही आधी खारच्या पूर्वेला राहत होतो. पण तिथे माझं मन लागत नव्हतं. मला नेहमी वाटायचं की आपण अजून पुढे गेलं पाहिजे, मोठं घर घेतलं पाहिजे. पण अरुणचा प्रॉब्लेम वेगळा होता. त्याची आई शेजारीच राहायची, त्यामुळे तो म्हणायचा मी आईला सोडून कुठेही जाणार नाही.
त्यावेळी मी अरुणला खूप समजावलं. म्हटलं, घराचे भाव रोज वाढतायत, आता नाही घेतलं तर नंतर घेणं अवघड होईल. आता इन्व्हेस्ट करायची हीच वेळ आहे. माझी एक मैत्रीण होती, ती मला सारखी म्हणायची की तू तिथून बाहेर पड, जर आताच पाऊल उचललं नाहीस तर आयुष्यात काहीच होणार नाही.
पण अरुण काही केल्या ऐकायला तयार नव्हता. तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. मग मी विचार केला, हा येत नसेल तर मी एकटी जाते. मी स्वतः जाऊन भाड्याने घर शोधलं आणि तिथे राहायला गेले. सगळं घर मी एकटीने बघून आले होते. माझी मुलगी सुकन्या त्यावेळी मोठी झाली होती. ती नेहमी माझ्या सोबत असायची. मी तिला सांगितलं की मी असा निर्णय घेते आहे. ती पण म्हणाली, आई तू म्हणतेस ते बरोबर असेल तर कर. पण पप्पाचं काय? मी म्हटलं बघूया काय होतंय ते. मी तिला पण ते नवीन घर दाखवून आणलं. सगळे कागदपत्रे, व्यवहार सगळं मी एकटीने केलं.
माझ्या मैत्रिणीने मला आयडिया दिली होती की आधी तू भाड्याने तिकडे राहायला जा, म्हणजे तुला आजूबाजूला चांगलं घर मिळेल. तिथे राहिल्यावरच आजूबाजूच्या घरांची माहिती कळते. म्हणून मी घरातून बाहेर पडले.
त्यावेळी माझ्याकडे थोडे जास्त पैसे होते, त्यामुळे मी पण अरुणला जास्त विचारलं नाही. त्या हसत हसत म्हणाल्या की मी तेव्हा सक्षम होते, पण हा पण त्याच्या मतावर ठाम होता की मी आईला सोडणार नाही.
मग मी आणि माझी मुलगी सुकन्याने मिळून ट्रक बोलावला. सामान भरायला सुरुवात केली. तेव्हा अरुण एका कोपऱ्यात रुसून बसला होता. त्याने ठरवलं होतं की काही झालं तरी मी या घरातून जाणार नाही.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत वैशाली पुढे म्हणाल्या, मग मी त्याला सरळ सांगितलं, ठीक आहे तू इथेच राहा. मी माझा सगळा संसार, मला लागणाऱ्या गोष्टी सगळं पॅक केलं. पण मुद्दाम त्याच्या कपड्यांना हात पण लावला नाही.
सगळं सामान बाहेर काढल्यावर शेवटची बॅग घेताना मी त्याला विचारलं, आता तू काय करणार आहेस? तेव्हा तो लहान मुलासारखा रुसून म्हणाला, भर माझी पण बॅग! आता बायको आणि मुलीशिवाय तो एकटा कसा राहणार? शेवटी तो यायला तयार झाला. अगदी शेवटच्या क्षणाला मी त्याचे कपडे भरले. त्याने मला अजिबात मदत केली नाही. त्याला कार्यक्रमात मिळालेल्या शालींमध्ये मी त्याचे सगळे कपडे भरले आणि आम्ही नवीन घरात निघालो.






