Pimpri News : 'लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?'; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांच्या भेटीसाठी ठरवलेल्या वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. ‘तुम्हाला लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का? कोणी कधीही येतो, कधीही जातो,’ असा सज्जड दमच आयुक्त सिंह यांनी भरला. यापुढे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
महापालिकेत साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असून नगरसेवक नसल्याने नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडेच आपले प्रश्न घेऊन जावे लागते. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आयुक्त सिंह यांनी आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस दुपारी ३ ते ६ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी खुले ठेवले आहेत. तसेच, यावेळी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या दालनात उपस्थित राहावे, असा स्पष्ट आदेशही दिला आहे.
हेदेखील वाचा : Ajit Pawar: हिंजवडीत पुन्हा पूर येऊ नये म्ह्णून ओढ्यावर बांधलेल्या…”; अजित पवारांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश
मात्र, सोमवारी, सिंह हे स्वतः मुख्यालयात उपस्थित नसताना अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुखही अनुपस्थित होते. त्यामुळे भेटीसाठी आलेल्या नागरिकांचा हेलपाटा वाढला आणि नाराजीचा सूर उमटला. संबंधित तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.
‘मी शहराबाहेर जाताना सूचना देतो, मग तुम्हाला काय अडचण?’
बैठकीदरम्यान बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, “मी स्वतः मुख्यालय सोडताना किंवा शहराबाहेर जाताना नगरविकास विभागाच्या सचिवांना कळवतो. मग विभागप्रमुखांनी तसे करायला काय हरकत आहे? नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिकारीच अनुपस्थित असतील तर उत्तर कुणी द्यायचं?” असा सवालही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला.
केवळ घोषणांचा दिखावा? नागरिकांमध्ये नाराजी
महापालिकेने ठरविलेल्या नागरिक भेटीच्या वेळेतही अधिकारी अनुपस्थित राहतात, ही बाब नागरिकांमध्ये नाराजीचा विषय बनत आहे. “लोकशाहीचा केवळ दिखावा सुरू आहे का?” असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी विचारला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत जेव्हा कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली, तेव्हा “साहेब आले नाहीत,” एवढंच उत्तर मिळालं, अशी माहिती काही तक्रारदारांनी दिली.
…तर संबंधितांवर कारवाई केली जाणार
यापुढे कोणताही अधिकारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, आणि ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी देत प्रशासनाला शिस्त लावण्याचा निर्धार व्यक्त केला.