हिंजवडीचे रुपडे पालटण्यासाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये (फोटो - सोशल मीडिया)
पिंपरी: मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पावसाचे मोजमाप, पाण्याचा प्रवाह, बुजवलेले ओढे आणि अनधिकृत बांधकामांबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ‘हिंजवडीत पूर पुन्हा होणार नाही, यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत,’ अशी ग्वाहीही पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘बुजवलेले सर्व ओढे मूळ प्रवाहातून नदीकडे वळवण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील पावसाने माजला होता हाहाकार गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. काही रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. परिणामी, अनेक वाहने पाण्यात अडकली होती आणि आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या प्रवासाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. या घटनांनंतर अजित पवार यांनी स्वखर्चाने हिंजवडीची पाहणी केली. त्यानंतर रविवारी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. सर्वेक्षणाची जबाबदारी विविध यंत्रणांकडे या बैठकीत जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांना संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
हिंजवडीत सरासरी किती पाऊस पडतो? किती पाणी साचते आणि वाहते? कोणते ओढे बुजवले गेले आहेत? ओढ्यांवर किती आणि कोणत्या प्रकारच्या अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत? ओढ्यांवरील इमारती पाडण्याचे आदेश पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ओढ्यांवर बांधलेल्या अनधिकृत इमारती हटवाव्यात. इमारती खूप मोठ्या असतील आणि त्यांचे स्थलांतर तातडीने शक्य नसेल, तर त्यामधून पर्यायी मार्गाने ओढ्यांना नदीपर्यंत प्रवाहित करण्याची योजना आखावी.
ग्रामपंचायतींच्या चुकीमुळे वाढला प्रश्न हिंजवडी, माण, मारुंजी, घोटवडे, कासारसाई, म्हाळुंगे, सूस, पिरंगुट आदी परिसरात रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. ओढ्यांमध्ये भाजी मंडईसारख्या सार्वजनिक आरक्षणाची नोंद ग्रामपंचायतींनी चुकीने केली आहे, हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतींना सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी योग्य जागा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ठळक मुद्दे: पूरग्रस्त हिंजवडीत जलवाहिन्यांचे सर्वेक्षण सुरू ओढ्यांवर उभारलेल्या इमारती हटवण्याचे आदेश पावसाचे प्रमाण आणि पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास ग्रामपंचायतींच्या आरक्षणातील चुका दुरुस्त होणार पूरग्रस्त भागांत रस्ते आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे निर्देश