अलिबाग : सर्वाना आतुरता आहे ती फक्त गणेशोत्सवाची. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना आता मुर्त्यांची मागणी सुरु आहे. पेणच्या गणपतीला राज्यामध्ये त्याचबरोबर देशामध्ये मागणी असते. पेणच्या गणपतीच्या मूर्त्यांना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पेणसह जिल्ह्याचे नाव देखील उंचावले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती भवनात आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये भौगोलिक मानांकन पेणच्या गणपती व्यवसायिकांना बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींना आता स्वतःची ओळख निर्माण झाली आहे.
पेण हे गणरायाचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. पेणच्या गणपतींना देशासह जगभरातून मोठी मागणी असते. अनेक कुटुंब गणेश मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात पिढ्यानपिढ्या काम करीत आहेत. वर्षभर गणपती कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. या व्यवसायातून पेण तालुक्यात करोडोची उलाढाल दरवर्षी होत असते.
पेणचे गणपती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेश मूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे पेणच्या गणराय व्यवसायिक यांना फटका बसत होता. यासाठी गणपती व्यवसायिक यांनी दीड वर्षापूर्वी पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने पेणच्या गणपतीला भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात एका कार्यक्रमात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना आता स्वतः ची ओळख निर्माण झाली आहे.