
बालवडकर पुढे म्हणाले, “हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे म्हणूनच ते आता प्रभाग ९ मध्ये दारोदारी फिरत आहेत. एका माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्र्याला अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे. प्रभागात लोकांचा कल स्पष्ट आहे. जितके चंद्रकांत दादा पाटील इथे फिरतील, तितकी आमची लीड वाढत जाईल—कारण जनतेला आता कामाचं राजकारण हवं आहे,” असेही त्यांनी नमूद केले. (PMC Election 2026)
अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी सतत संवाद ठेवण्याचा आणि प्रभागाच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा पुनरुच्चार करत “ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या निकषांवरच लढली जाईल. चंद्रकांत पाटील यांनी आता पोपट घेऊन फिरले पाहिजे, मला उमेदवारी दिली असती तर चंद्रकांत पाटलांवर अशी फिरायची वेळ आली नसती.’ असा टोलाही त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐनवेळी युवा नेते अमोल बालवडकर यांचे महापालिका निवडणुकीचे तिकीट कापल्याने पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या अमोल बालवडकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपविरोधात थेट मोर्चा उघडला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे शहरातील पहिली जाहीर सभा अमोल बालवडकर यांच्या समर्थनार्थ घेत त्यांना राजकीय ताकद दिली.
या सभेत बोलताना अमोल बालवडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितल्याचा राग धरून माझी महापालिकेची उमेदवारी कापण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “तिकीट देतो, असे सांगून मला शेवटपर्यंत झुलवले गेले. ज्यांनी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात येत्या चार वर्षांत अश्रू आणून बदला घेईन,” असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.
Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल ‘इतक्या’ कोटींचे एमएसआरडीसीच्या
पुढे बोलताना बालवडकर म्हणाले, “एका दादाने दीड वर्ष माझ्या विरोधात कट-कारस्थान केले, मात्र दुसऱ्या दादाने—अजित पवार यांनी—अवघ्या दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला.” त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुणे महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.