गंगाधाम चौकात ‘हाईट बॅरियर' बसवणार; रस्त्यावर संपूर्ण दिवसभर अवजड वाहनांना बंदी
पुणे : गंगाधाममधील आई माताजी चौकात शहर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या असून, याठिकाणी हाईट बॅरियर बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच आता यापुढील काळात या भागात पुर्ण दिवसभर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही येथून वाहतूक सुरू असल्याने, हे ‘हाईट बॅरियर’ बसवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
गतीरोधक आणि ‘हाईट बॅरिअर’ची उपाययोजना
अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. गंगाधाम ते आई माताजी मंदिर दरम्यानच्या उतारावर अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी ‘हाईट बॅरिअर’ लावला जाणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक (स्पीड ब्रेकर) टाकण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नियमभंग करणाऱ्या ट्रकचालकावर गुन्हा
अपघातप्रकरणी ट्रकचालक लल्लन साह (वय ३४, रा. सणसवाडी) याच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व २३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुकीत सुधारणा होणार
गंगाधाम परिसरात अपुऱ्या रस्त्यांमुळे व वाढत्या रहदारीमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने, येत्या काळात महापालिकेसोबत समन्वय साधून अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणांविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा संताप
पोलिस आयुक्तांच्या पाहणीदरम्यान बुधवारी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. पोलिस आयुक्तांनी त्यांची भेट घेत सात्वंन केले. यावेळी कुटुंबीयांनी संताप व्यक्त करीत, बेकायदा चालणाऱ्या अवजड वाहतुकीला चाप लावण्यासह कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गंगाधाम चौकात उतार कमी करण्याचा प्रयत्न
गंगाधाम चौकात तीव्र उतार आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होतात. यापुर्वीही अपघात झाले असून, अनेकांचा जीव गेला आहे. या ठिकाणचा उतार कमी करण्याबाबत प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे आतापर्यंत दिसत आहे. परंतु, बुधवारी पुन्हा अपघात झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उतार कमी करण्याच्या अनुषंगाने पथ विभागाने निविदा मागवली असून, निविदा मान्य झाल्यानंतर तातडीने गंगाधाम चौकातील उतार कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.
या रस्त्याचा उतार खूप तीव्र असल्याने बऱ्याच वेळा जड वाहनांमुळे अपघात होतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठरावीक वेळेत जड वाहनांना बंदी घातली होती. तरीही काही वेळा वाहने जात होती. या पार्श्वभूमीवर आता पुर्ण दिवसभर बंदी घालून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, वेळेप्रसंगी वाहने जप्तीची कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : परवानगी नसतानाही अवजड वाहनांची पुण्यात ‘एंट्री’; तब्बल इतक्या जणांनी गमवला जीव
पोलिसांना पालिकेचे हाईट बॅरियर बसविण्याचे पत्र
गंगाधाम रस्ता वर्दळीचा असून, मार्केट यार्डच्या चौकात येऊन वर कात्रज कोंढवा रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण तसेच कात्रज कोंढवा रस्त्यावरून खाली गंगाधाम चौकात येणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठे आहे. यात जड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे येथे जड वाहनांना प्रवेश बंदी करावी. तसेच, हाईट बॅरियर बसवण्याबाबत परवानगी देण्यात यावी, असे पत्र महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर यांनी वाहतूक पोलिसांना पाठविले आहे.