वडगावात पोटोबा महाराजांच्या दर्शनाला लाखो भाविकांची गर्दी; मानाच्या काठ्या बगाडाचा मोठा उत्साह
गावागावांमध्ये यात्रा आणि जत्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव मावळमध्ये देखील पोटोबा आणि जोगेश्वरी देवीची यात्रा उत्साहात पार पडली आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज उत्सव शनिवारी (दि. 12) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भल्या पहाटेपासून पोटोबा जोगेश्वरी मंदिरात दर्शन घेण्याकरिता स्थानिकांनी गर्दी केली होती. पुणे जिल्ह्यासह मावळ पंचक्रोशीतील कानाकोपर्यातून भाविकांनी गर्दी केल्याने वडगाव परिसर भाविकांनी गजबजला होता.
यावेळी अभिषेक,छबिना, मानाचे बगाड,मानाच्या काठ्या, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी पोटोबाच्या नावानं..चांगभलं! असा अखंड जयघोष करण्यात आला. पहाटे देवस्थानचे सर्व विश्वस्त व उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातेच्या मूर्तीना अभिषेक घालून उत्सवाची सुरुवात झाली.यानंतर महापूजा, महाआरती व श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला.
सकाळच्या सुमारास चावडी चौकातील गुरव वाड्यापासून मंदिरापर्यंत छबिना मिरवणूक काढण्यात आली.यावेळी छबिना मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आला होत्या. तसेच चौघडा वादनासह मोठ्या उत्साहात श्रींचे आगमन झाले. त्यानंतर श्रींची पूनर्स्थापना करून पेशवेकालीन सोन्याचे मुखवटे परिधान करण्यात आले. दुपारी मानकरी गणेश गोविंदराव ढोरे यांच्या हस्ते मिरवणूक व पूजा करून मानाचे बगाड सुरू करण्यात आले.यावेळी अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी व बगाड पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच मावळ
तालुक्यातील येळसे व शेटेवाडी येथून आलेल्या मानाच्या काठ्यांचे उत्साहात आगमन झाले.
सायंकाळनंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती उत्सव, यानिमित्ताने विविध प्रकारची दुकाने, लहान मुलांची खेळण्याची साहित्य यामुळे उत्सवाला भाविकांची गर्दी झाली होती. उत्सवानिमित्त. रात्रीच्या वेळी परंपरेप्रमाणे शोभेचे दारूकाम, भजन स्पर्धा व प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सवानिमित्त रात्री भजन हरी सागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी (दि.13) सकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातेची पालखी गावातून प्रदिक्षणा काढण्यात आली. यावेळी बैलगाडीतून नगारा वादन तसेच महाराजांच्या पालखी समोर आळंदी येथील बाल वारकरी भजन मंडळाच्या टाळमृदुंगाच्या आवाजाने वडगावात धार्मिक उत्सव वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोटोबा देवस्थानचे विश्वस्त गणेश ढोरे ,सुभाष जाधव, चंद्रकांत ढोरे, अनंत कुडे, तुकाराम ढोरे, भास्कर म्हाळसकर अरुण चव्हाण, सुनिता कुडे, किरण भिलारे, पुजारी विवेक गुरव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे धावपळ
ग्रामदैवत श्रीपोटोबा महाराजांचा उत्सव सुरू असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिक, विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.
कुस्त्यांचा आखाडा रद्द
शहरात ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा उत्सव आणि त्यानिमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाडा सुरू असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कुस्त्यांचा आखाडा रद्द करण्यात आला.
https://youtu.be/su6tqkNXiKw?si=uxqyY0KFe7xrNJRf
Web Title: Potoba and jogeshwari temple yatra vadgaon maval news update