निवडणुकीआधी महायुतीमधील प्रहार पक्षाला बसणार 'कडू' धक्का; 'हा' आमदार शिवसेनेत प्रवेश करणार?
मुंबई: राज्यात लवकर विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. तसेच निवडणुकीसाठी अनेक इच्छुक देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच अनेक मोठे नेते आणि इच्छुक उमेदवार पक्ष बदलत आहेत. प्रहार पक्षाचा एक आमदार शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतच फोडाफोडी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे सहकारी आमदार राजकुमार पटेल हे महायुतीतील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेल हे मेळघाटातील प्रहारचे आमदार आहेत. राजकुमार पटेल यांच्या बैठकीचे एक पोस्टर व्हायरल होत आहे. दरम्यान प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह लहान पक्षांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे.त्याच दरम्यान बच्चू कडू यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बैठकीचे पोस्टर व्हायरल होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्या बैठकीत बच्चू कडू यांचा फोटो आणि त्यांचे पक्षाचे चिन्ह दिसत
नसल्याची चर्चा सुरू आहे. तसेच त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेसाठी राजकुमार पटेल यांना मोठा शब्द दिला गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आमदार राजकुमार पटेल हे प्रहार पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करणार हा अशी चर्चा आता प्रहार पक्षासाह राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. यावरून आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील मुख्यमंत्र्यांना इशारा दिल्याचे समजते आहे.
प्रत्येकाचा एक राजकीय स्वार्थ असतो. त्यामुळे राजकुमार पटेल जे जात असतील तर आम्हाला पर्वा नाही. ते जिथे जटिल त्या ठिकाणी त्यांनी सुखी राहावे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला घात केला तर, आम्ही त्यांना त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ. तसेच शिवसेनेला देखील याचे परिणाम भोगायला लावू, असा इशारा प्रहारचे अध्यक्ष आणि महायूतीमधील आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.