
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यव्यापी आंदोलन उभे करणारे जरांगे पाटील यांच्या पाठिशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे. त्यांनी काढलेल्या यात्रेमध्ये लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. यामुळेच आता मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढवण्याचा (Advice for Manoj Jarange Patil to contest election) सल्ला राजकारणीय वर्तुळातून दिला जातो आहे. थेट लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवावी आम्ही पाठिंबा देऊ असा सल्ला राजकारणातील एका महत्त्वाच्या नेत्याने दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी, आम्ही पाठिंबा देण्यास तयार असल्याची भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “जरांगे पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी. ते निवडून येतील अशी आमची खात्री आहे. लोकसभेत गरीब मराठ्यांचा प्रश्न मांडता येईल. वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, “जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी. त्यांनी जालन्यातून आपली उमेदवारी जाहीर करावी. त्यांच्याबरोबर आमचे जालन्यातील पदाधिकारी चर्चा करतील. ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न कायम तेवत ठेवता येईल. लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवता येईल. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. ते आमचा सल्ला मान्य करतील, अशी आमची अपेक्षा आहे.” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
सरकारचे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष
याच बरोबर राज्य सरकारवर देखील प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. “सरकार मनोज जरांगे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाचा प्रश्न हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शासानाने मध्यंतरी कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय काढला होता. शिंदे समितीमार्फत आमचे काम चालू आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. लोकसभेची निवडणूक संपल्यावर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होईल. सत्तेतवर राहिलेल्या मराठ्यांनी या प्रश्नाला डावलेलेलं आहे. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की पुन्हा या समस्येकडे दुर्लक्ष करता येईल, असा त्यांचा विचार आहे. त्यामुळेच मनोज जरांगेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी असा निरोप आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहे,” असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.