पुणे – लोकसभा निवडणूक जवळ आल्याने प्रचार आणि सभा वाढल्या आहेत. त्याचसोबत भावनिक आवाहन देखील यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये वाढली आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. अजित पवार गट व शरद पवार गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगा….काय चुकलं तीचं ? असा आशयाने सुप्रिया सुळे यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर शरद पवार व सुप्रिया सुळे यांचा फोटो देखील शेअर केला आहे.
अजित पवार यांनी शरद पवार गटामध्ये बंड पुकारल्यानंतर पवार कुटुंबांमध्येच लोकसभा निवडणूकीचे दोन्ही उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या लेक सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटाकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. त्याच बरोबर खास फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शरद पवार खुर्चीवर बसलेले असून सुप्रिया सुळे त्यांचे खाली वाकून बुट घालत आहेत. तसेच मागे देवेंद्र फडणवीस उभे आहेत. हा फोटो शेअर करत प्रशांत जगताप यांनी पोस्ट केली आहे.
काय चुकलं तीचं ?
जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला.
पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन्… pic.twitter.com/zfp6jVeYZA— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 13, 2024
नेमकं काय लिहिले आहे पोस्टमध्ये ?
काय चुकलं तीचं ? जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला.
पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन् अहंकारी… की ज्याला स्वतःला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय. भाऊ शत्रूला जाऊन मिळाला… पण का? तेच कळेना… काय हवं होतं या भावाला? काय द्यायचं बाकी होतं? जीवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं… काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं ? आपल्या बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येतेय हे पाहताच भावाच्या फितुरीचं दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली, विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन् आपल्या बापाची ढाल झाली… ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय..! सांगा…. काय चुकलं तीचं ?