
एसटी कामगार संप मागे घेणार का? कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, परिवहनमंत्र्यांनी दिली माहिती (फोटो सौजन्य-X)
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. सन २०१८ पासून कर्मचाऱ्यांची उपरोक्त स्वरुपाची आर्थिक देणी प्रलंबित आहेत. त्यासाठी सुमारे ४४०० कोटी रुपये लागणार आहेत.
मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणी योग्य नाही, त्याकरता एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. म्हणून मी कार्यभार स्वीकारल्या पासून एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये, आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला १०० कोटी तसेच महामंडळाच्या बस आगारांत असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसेस करीता इंधन पुरवठा करतात. भविष्यात हे पेट्रोल पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. याद्वारे वर्षाला २०० ते २५० कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षाला ५००-६०० कोटी रुपयांची उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. या बरोबरच उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळाचे स्वतःचे प्रवासी ॲप विकसित करण्यात येत आहे, या मधूनही ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणात येणार आहे.
पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांना सदनिका व विश्रामगृह बांधण्याचे देखील प्रायोजन आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन होणाऱ्या प्रकल्प विकासातून महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित होईलच त्याचबरोबर वर्षाला एक ते दीड हजार कोटी रुपये उत्पन्न देखील मिळणे अपेक्षित आहे.
पुढील वर्षी अखेरपर्यंत ८ हजार नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. महामंडळाकडे एकूण १८-२० हजार बस संख्या करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी शासनाकडे मागितले आहे. तथापि, ती मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे. ही व्यवस्था वाढीव बसेसमधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल. त्यामधून निश्चितच उत्पन्न वाढणार आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यावेळी कामगार संघटनाच्या प्रतिनिधीसोबत त्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी विस्तृत चर्चा केली.