दापोली तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्थेच्या सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष हजारे (अध्यक्ष – दापोली तालुका मुख्याध्यापक संघ) यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्रमजीवी परिवार महाराष्ट्र या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला. नुकताच दापोली तालुक्यातील रसिक रंजन नाट्यमंदिर येथे श्रमजीवी परिवार या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक संतोष हजारे हे दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रेरणादायी संकल्पनेतून साकारलेल्या कार्याने शिक्षण, सामाजिक सुधारणा, स्वच्छता, राष्ट्रप्रेम, क्रीडा या पंचज्योतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याबद्दल या गौरवशाली कार्याची संस्थेने दखल घेऊन हे गौरव रुपी पुष्प त्यांना अँड. धनराज वंजारी सहाय्यक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) बृहन्मुंबई, राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस तसेच प्रकाश कावणकर, अमोल कुलकर्णी, हरेश कावणकर, प्रमुख, श्रमजीवी परिवार यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सत्कारमूर्ती व पुरस्कार प्राप्त मान्यवर व श्रमजीवी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.