यूपी योद्धाजचा गुजरात जाएंट्सवर मोठा विजय; ५९-२३ अशा मोठ्या फरकाने मिळवला विजय
पुणे : एकतर्फी झालेल्या लढतीत युपी योद्धाज संघाने गुजरात जाएंट्स संघाला ५९-२३ अशी धूळ चारली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये दिमाखदार कामगिरी केली. पूर्वार्धात युपी योद्धाज संघाकडे १८ गुणांची आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात जाएंट्स व युपी योद्धाज यांच्यात आजपर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात बारा वेळा लढती झाल्या असून त्यापैकी सात वेळा गुजरातने विजय मिळविला होता.
दोन वेळा सामना बरोबरीत सुटला
तीन वेळा युपी योद्धाज संघ विजयी झाला होता. दोन वेळा सामना बरोबरीत सुटला होता. यंदाच्या मोसमात गुजरात संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी फक्त पाचच सामने जिंकले आहेत. याउलट युपी संघाने २० पैकी ११ सामने जिंकून प्ले ऑफ मधील स्थान निश्चित केले आहे.
दोन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी
सुरुवातीच्या बरोबरीनंतर युपी संघाच्या खेळाडूंनी पकडी व चढाया या दोन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करीत आठव्या मिनिटालाच पहिला लोण चढविला आणि पाच गुणांची आघाडी घेतली. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला त्यांच्याकडे आठ गुणांची आघाडी होती. मध्यंतरास दोन मिनिटे बाकी असताना युपी संघाने आणखी एक लोण नोंदविला आणि आपली बाजू आणखीनच बळकट केली. मध्यंतराला त्यांनी २९-११ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातही सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ
युपी योद्धाज संघाने उत्तरार्धातही सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ केला आणि दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण चढविला. त्यावेळी त्यांच्याकडे ३५-१२ अशी आघाडी आली होती. त्यानंतर युपी संघाने चौथा लोण नोंदवित एकतर्फी विजय निश्चित केला. त्यावेळी त्यांच्याकडे ३१ गुणांची आघाडी होती. सामन्याच्या ३३व्या मिनिटाला त्यांनी गुणांचे अर्धशतकही पार केले. शेवटपर्यंत त्यांनी सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती. युपी संघाकडून गगन गौडा याने पल्लेदार चढाया केल्या तर भवानी रजपूत याने अष्टपैलू खेळ करीत त्याला उत्तम साथ दिली. गुजरात संघाकडून राकेश व गुमानसिंग यांनी चांगली लढत दिली.