होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
उत्तूर : होन्याळी (ता.आजरा) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या पालकांचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय होण्याळी ग्रामस्थांनी घेतला आहे. यापूर्वी याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
गेल्या वर्षी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका यांचा सत्कार, ग्रामपंचायत होन्याळी, शाळा व्यवस्थापन समिती, भैरीदेव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. प्रकाश देऊसकर यांनी पहिलीच्या मुंलाना शैक्षणिक साहित्य दिले. ग्रामपंचायतीमार्फत सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
तसेच भैरीदेव मंडळ, होन्याळीमार्फत शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली विद्यार्थ्यीनी शताक्षी संदिप लकांबळे हिचा करण्यात आला. यावेळी सरपंच स्मिता पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर सरोळकर, अभिजित खाडे, प्रकाश देऊसकर, तूळशिदास लकांबळे ग्रामपंचायत सदस्य-युवराज बिरबोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आणखी एका ग्रामपंचायतीने घेतला निर्णय
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास यंदाच्या वर्षासाठी घरफाळा माफ करण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनातून या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
१९१९ साली प्रयाग चिखली गावात पहिली शाळा सुरू
कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९१९ साली प्रयाग चिखली गावात पहिली शाळा सुरू केली. या शाळेला १०० वर्षांचा इतिहास आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचं संवर्धन व्हावं या उद्देशाने आणि शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावच्या ग्रामपंचायतीनं मासिक सभेत हा निर्णय घेतला आहे. सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या प्रयाग चिखली गावात ग्रामपंचायतीकडे १२३० नोंदणीकृत मिळकतधारक आहेत.