sanjay shirsat take side of neelam gorhe and target thackeray group
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोनमध्ये येते याची कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
रेडझोनमुळे नागरिकांना त्यांची घरे विक्री करता येत नाहीत, मालमत्तावर कर्ज घेता येत नाही. जमीन विकसीत करता येत नाही तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास ही करता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. याबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) निगडी- यमुनानगरचे विभागप्रमुख सतीश मरळ यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर यांना निवेदन देत यामध्ये विशेष लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पुढाकार घेण्यात येत आहे. त्यानुसार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्तांना पिंपरी चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेडझोन क्षेत्राबाबत स्पष्टता गरजेची
निगडीतील सर्वे नंबर ५६,५७ व ६३ हे रेड झोनमध्ये येत असताना या सर्व्हे नंबर मधील शरदनगर मध्ये एसआरए प्रकल्प सुरू झाला आहे. मात्र, हे क्षेत्र रेड झोनमध्ये येत नाही, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे कोणते क्षेत्र रेड झोनमध्ये व कोणते क्षेत्र बाहेर आहे. याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
एसआरए प्रकल्पच्या परवानगीची चौकशी करा
शरदनगरमधील रेड झोनमध्ये रेनबो डेव्हलपर यांना परवानगी कशी दिली गेली याबाबत ही चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच पिंपरी चिंचवड भागातील यमुनानगर, त्रिवेणीनर, चिखलीतील मोरे वस्ती, साने चौक हे रेड झोन क्षेत्रामध्ये येते का ? याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.