Pune Drone Show organized by MP Muralidhar Mohol on PM Narendra Modi birthday SP College
Pune Drone Show : पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला आहे. यानिमित्ताने भाजप नेत्यांकडून संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रोन शोचा उपक्रम आयोजित केला आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिनी 17 सप्टेंबर रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोव्दारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे.
केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो ४५ मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारे पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो आकाशात पाहता येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तामे हजारो ड्रोन पुण्याच्या आकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, ‘या निमित्ताने 17 सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते १० ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ या’. असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढे म्हणाले की, ‘२६ मे २०१४ या दिवशी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या मोदींचे दृष्य आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी गेल्या अकरा वर्षात १४० कोटी देशवासीयांना ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हा मंत्र देत देशात आणि देशाबाहेर ताठमानेने उभे रहाण्याचे बळ दिले. ‘मै देश को झुकने नहीं दुंगा’ हा वज्रनिर्धार करत विकसित भारताचा संकल्प करुन देशवासीयांसाठी ते प्रेरणास्रोत झाले आहेत. सर्वसामान्य देशवासीयांचे जीवनमान उंचाविण्यापासून ते मंगळापर्यंत झेप घेणारे नवे अवकाश धोरण राबविणारे, करोनाची लस मोफत देऊन आफ्रिकेसह १४० लहान, गरीब देशांतील नागरीकांच्या जीवनाचे रक्षण करण्यापासून ते पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची नांगी ठेचणे, हे मोदींचे कर्तृत्व आहे. भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम सादर होतो आहे. या दिवशी आपण सर्व पुणेकर त्यांना शुभेच्छा देऊ या’ असेही मोहोळ म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी देणार पंतप्रधान मोदींना शुभेच्छा!
पंतप्रधान मोदी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा होत असताना पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत. यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेले शुभेच्छा संदेश एकत्र करुन थेट पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी यावेळी दिली.