नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा पार पडला असून रोहित पवारांनी जोरदार टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
Nashik Shetkari Aakrosh Morcha : नाशिक : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. मनसे, शिवसेना ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेतकरी आक्रोश आंदोलन करण्यात आले. जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला.
नाशिक शहरात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाच्या मुख्य मागण्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करणे, कर्जमाफी आणि शेतीमालाचे हमीभाव या मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाषणामध्ये कांद्याची माळ घातलेली दिसून आली. याचबरोबर खासदार निलेश लंके यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांनी भाज्यांच्या माळा घातल्या असल्याचे देखील दिसून आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी शेतकरी आक्रोश मोर्चामधून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाषणादरम्यान ते म्हणाले की, “नाशिकची भूमी ही प्रभू रामचंद्रांची आहे. प्राण जाय पण वचन नहीं जाए हीच शिकवण प्रभू रामांनी दिली. मात्र भाजपचे सर्व नेते आणि सरकार निवडणुकींच्या काळामध्ये प्रभू रामांवरुन राजकारण करतात. त्यांचं नाव वापरतात. पण आता मतदार, शेतकरी, महिला सर्वजण विचारत आहेत की तुम्ही जे निवडणूकीच्या पूर्वी वचन दिलं होतं त्या वचनाचं काय झालं? शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, युवांना नोकऱ्या देऊ..विद्यार्थ्यांसाठी योजना आणू आणि महिलांना सुरक्षा देऊ अशी अनेक वचनं या सरकारने निवडणुकीआधी दिली. नंतर मात्र कोणतंही वचन पूर्ण केलं नाही,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आमदार रोहित पवार म्हणाले की, “या सरकारला वाटतं आमच्याकडे खूप आमदार आहेत. आमचं कोणी काही वाकड करु शकत नाही. आम्हाला कोणी अडचणीमध्ये आणू शकत नाही हा घमंड सरकारमध्ये आला आहे. सरकारला माज चढला आहे तो उतरवला पाहिजे. या सरकारने आपल्या सर्वांना फसवले आहे. सरकारमध्ये असताना म्हणतात योग्यवेळी आम्ही कर्जमाफी देऊ…पण दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाच वर्षात 14 जहार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सरकारला वाटतं की 2029 च्या निवडणुकीच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि त्यानंतर परत एकदा सत्तेमध्ये येऊ,” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.