अधिकारी अन् कर्मचारी करतात तरी काय? कामचुकार करणाऱ्यांना घरी बसविणार; आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा
मांजरी : “चार वर्षे उलटूनही समाविष्ट गावातील प्राथमिक सुविधांबाबतच्या समस्या अद्याप सुटू शकल्या नाहीत. कचरा, ड्रेनेज, वीज, पाणी, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि दररोजच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष होत असलेले दिसत आहे. सामान्य माणसाला किती त्रास सहन करावा लागत असेल, मग येथील अधिकारी आणि कर्मचारी करतात तरी काय ? असा सवाल करीत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गय न करता घरी बसविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
शेवाळेवाडी व मांजरी गावातील समस्यांची पाहणी
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व शेवाळेवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी तीन दिवसांपूर्वी नव्याने समाविष्ट शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक तसेच साडेसतरानळी व केशवनगर परिसरातील समस्यांबाबत आयुक्त राम यांची भेट घेऊन निवेदन दिले होते त्यावेळी आयुक्तांनी दोन दिवसात या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी विविध अधिकाऱ्यांसह शेवाळेवाडी व मांजरी गावातील समस्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
प्रत्यक्ष उभे राहून समस्या घेतल्या जाणून
कचरा, ड्रेनेज, अरुंद रस्ते, त्यावरील खड्डे, अतिक्रमणे, पाणीपुरवठा, शाळांचा परिसर, त्यांना मिळवणाऱ्या सुविधा, अस्वच्छता, पथदिव्यांचा अभाव, सोलापूर महामार्गावरील धोकादायक ड्रेनेज असे एक ना अनेक प्रश्न त्यांना यावेळी जाणवले. पालिका हद्दीत इतक्या समस्या कशा असू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. शेवाळेवाडी व मांजरी परिसरातून उघड्यावरून वाहणाऱ्या सांडपाणी वाहिन्या, सोलापूर महामार्गावरील धोकादायक ड्रेनेज, कवडीपाट टोलनाका भापकरमळा रस्ता, मांजरी बुद्रुक येथील शाळा परिसर, मांजरी गावठाण ते मगर महाविद्यालय रस्ता, रेल्वे उड्डाणपूल आदी ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष उभे राहून समस्या जाणून घेतल्या.
विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित
महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी, प्रसाद काटकर, संदीप कदम, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, जगदीश खानोरे, नंदकुमार जगताप, अधीक्षक अभियंता आशिष जाधव, हडपसरचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर, राजेश शिंदे, उपअभियंता गणेश पुरम, राकेश शिंदे, सुनील पाटील, प्रवीण येळे, विभागीय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, राकेश काची, आकाश ढेंगे, निखिल मोरे, शाहिद पठाण, अनंत ठोक आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थ सुनील शेवाळे, विजय कोद्रे, संजय कोद्रे, मंगेश शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, अक्षय शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, सिद्धार्थ शेवाळे, सुरेश शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.