Pune NCP ajit pawar new city president and new working president announced political news
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्तरावरील राजकारणामध्ये वेग आला आहे. लवकरच पुणे महानगर पालिकेचे बिगुल वाजणार असून याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट देखील पुण्यामध्ये कामाला लागला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला होता. खोटे कागदपत्र सादर केल्याबाबत दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद रिकामे होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत.
पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकसंख्या आणि उद्योगधंदे वाढत असल्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने शहराध्यक्ष निवडीसाठी शहराचे दोन भागांमध्ये विभाग केले आहेत. पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे. भविष्यातील राजकीय गरज लक्षात घेत राष्ट्रवादीकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहराचे पूर्व पुणे भागामध्ये पूर्वेकडील मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये कसबा मतदारसंघ, कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, हडपसर मतदारसंघ व वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश आहे. या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधण्यात आले आहे. या पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणावेळी सुनील टिंगरे हे चर्चेत आले होते. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी पुण्यातील राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरे आणि दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रुपाली पाटील यांनी संवेदनशीलता दाखवून तप्तरतेने कास्पटे परिवाराची भेट घेतली होती. तसेच कास्पटे परिवाराला वैष्णवीचे बाळ परत मिळवून देण्यामध्ये प्रयत्न केला होता. यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील शहराचे दुसरा विभाग पश्चिम पुणे म्हणून राष्ट्रवादीने केला आहे. पुणे शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघ, खडकवासला मतदापसंघ, कोथरूड मतदारसंघ आणि शिवाजीनगर मतदारसंघ या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या चार मतदारसंघाला पश्चिम पुणे म्हणून संबोधण्यात येणार आहे. पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आणि माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा आज उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी केली. या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली आहेत.