अपघात रोखण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; 'या' ठिकाणी जड वाहनांना प्रवेशबंदी
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातचं आता गंगाधाम चौकातील तीव्र उतारावर वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, अखेर त्या ठिकाणी हाइट बॅरिअर बसवण्याचे काम सुरू झाले आहे. याचबरोबर जड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.
११ जून २०२५ रोजी गंगाधाम चौकात झालेल्या अपघातात एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला होता. त्याआधीही १२ जून २०२४ रोजी अशाच प्रकारे अपघातात एका महिलेने प्राण गमावले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध राजकीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या मागणीवर दीर्घ काळ दुर्लक्ष झाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या अपघातानंतर पथ विभागाचे अधिकारी पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्तक्षेपामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. आपत्कालीन वाहनांचा मार्ग मोकळा राहील, याची खात्री करून वाहतूक विभागाने हाइट बॅरिअरला परवानगी दिली.
सध्या कान्हा हॉटेल आणि आईमाता मंदिर चौकात हाइट बॅरिअर बसवण्याचे काम सुरू झाले असून, रस्त्यावर रॅम्बलरचे पट्टेही आखण्यात आले आहेत. ही कार्यवाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्थानिक नागरिक आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या सामूहिक संघर्षामुळे शक्य झाली असून, भविष्यात अशा अपघातांना आळा बसेल आणि निष्पापांचे प्राण वाचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, दिलीप अरुंदेकर, रामदास गाडे, रूपेश आखाडे, सुशांत ढमढेरे, राहुल गुंड, श्वेता होनराव, गौरव कापरे, प्रदीप सांगळे, नितीन हनमघर, अक्षय वायाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भूशी धरणाजवळ भरधाव कारने दोघांना उडवले
लोणावळ्यातील भूशी धरण परिसरात रविवारी (२९ जून) संध्याकाळी दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकाने रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारत असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला मारहाण करून त्याच्या कारला आग लावली. कार्तिक उल्हास चिंचणकर (२०, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव बुद्रुक, मावळ) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर अयान मोहम्मद शेख (१७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात करणाऱ्या कारचा चालक तुळशीराम रामपाल यादव (३२, रा. अँटॉप हिल, वडाळा, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे.