
पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी २०२ कोटींची कामे
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पीएच-५३ अंतर्गत २०२ कोटी ३९ लाखांच्या १९ विकासकामांना मंजुरी दिली आहे. काही कामांना सुरुवात झाली असून, काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
या प्रकल्पात पुणे स्थानकात नवीन सहा प्लॅटफॉर्म बनविण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्म क्र.११ आणि १२ चे पन्नास टक्के कामपूर्ण झाले असून, उर्वरित ७,८ व ९,१० चे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या कामांसाठी १२९ कोटी ५७ लाख खर्च करण्यात येणार आहे. तसेच जुने प्लॅटफॉर्म १ ते ६ यांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी ३७ कोटी १२ लाख खर्च होणार आहे. याशिवाय, प्रवाशांसाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यासाठी २२.१३ कोटी, तर नवीन पार्सल कार्यालयासाठी १३ कोटी ५७ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी सुमारे ५८०० चौरस मीटरचा होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. येथे सुरक्षा तपासणी, तिकीट काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन व्यवस्था, सौरऊर्जा, विद्युत आणि पाणीपुरवठ्याच्या आधुनिक सुविधा असतील. नवीन प्लॅटफॉर्मना जोडण्यासाठी दोन सहा मीटर रुंद पादचारी पूल (एफओबी) आणि ४२५ मीटर लांबीचा स्कायवॉक उभारला जाणार आहे. नवीन प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, एस्केलेटर, डिजिटल ट्रेन माहिती फलक, कोच गाईडन्स बोर्ड, उद्घोषणा प्रणाली, ८० सीसीटीव्ही कॅमेरे आणि २०० स्टील बाक बसविण्यात येणार आहेत.
जुन्या प्लॅटफॉर्मचे कायापालट होणार
जुन्या प्लॅटफॉर्मवरही अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्मचे नवीन फ्लोअरिंग, रंगकाम, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, ड्रेनेज व्यवस्था, शौचालयांचे आधुनिकीकरण, प्रतीक्षालयांची दुरुस्ती आणि हेरिटेज इमारतीचे सुशोभीकरण केले जाणार आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी टॅक्टाइल टाईल्स, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि पार्किंग सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत. याशिवाय नवीन पार्सल कार्यालय, बॅलेस्टलेस ट्रॅक आणि संपूर्ण स्थानकात नवीन दिशादर्शक फलक बसवण्याचे कामही केले जाणार आहे.
विकासकामांचा मोठा फायदा होणार
ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक अधिक आधुनिक आणि प्रवासी-अनुकूल होईल. वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी या विकासकामांचा मोठा फायदा होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुखकर होणार आहे.