अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित झाली (फोटो - सोशल मीडिया)
Pune Rain Update : पुणे : आकाश ढुमे पाटील : पुणे जिल्ह्यात १ व २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती व नागरी भागात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील सुमारे १०५ गावे बाधित झाली असून सुमारे २,३५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या नैसर्गिक आपत्तीत दोन ठिकाणी जीवितहानी झाली. पुणे शहरातील पर्वती परिसरात झाड कोसळून रंजना नवनाथ गिरी (वय ५७) यांचा मृत्यू झाला. तसेच खेड तालुक्यात पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू असताना वादळामुळे भिंत कोसळून अलका गणपत मसले (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय खेड तालुक्यात एका गाईचा झाडाची फांदी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुणे महानगरपालिका हद्दीतही पावसाचा मोठा परिणाम जाणवला. पाणी साचणे, झाडे पडणे, केबल तुटणे आदी स्वरूपाच्या सुमारे १४५ तक्रारी आपत्कालीन कक्षाकडे प्राप्त झाल्या. त्यापैकी सुमारे २९ तक्रारी गंभीर होत्या. सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मदत पुरविण्यात आली.
हे देखील वाचा : गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार
शेती क्षेत्रात इंदापूर, शिरूर, आंबेगाव, दौंड आणि बारामती तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कांदा, गहू, मका, ज्वारी, भाजीपाला यांसह द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा यांसारख्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले असल्याची नोंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत मदतकार्य सुरू केले आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांसाठी आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. मदतीसाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
अहवाल
अ. क्र, बाधित तालुका ,गावांची संख्या, लाभार्थी संख्या, क्षेत्र हे. ,शेतीपिके व फळपिके नाव
| बाधित तालुका | गावांची संख्या | लाभार्थी संख्या | क्षेत्र हेक्टरी | पिकांची नावे |
|---|---|---|---|---|
| भोर | 12 | 155 | 75 | गहू, कांदा, भाजीपाला, फुलपिके, आंबा |
| इंदापूर | 20 | 338 | 296 | केळी, द्राक्ष, आंबा, मका, ज्वारी, भाजीपाला, कांदा, गहू, लिंबू, डाळिंब |
| मुळशी | 05 | 84 | 16 | कांदा, भाजीपाला |
| आंबेगाव | 23 | 755 | 265 | कांदा, भाजीपाला, गहू, आंबा, मका, ज्वारी |
| खेड | 4 | 10 | 03 | गहू, कांदा, भाजीपाला |
| दौंड | 17 | 543 | 205 | फुलपिके, चारापिके, गहू, कांदा, भाजीपाला, फळपिके, डाळिंब |
| शिरूर | 97 | 2,190 | 1,326 | कांदा, भाजीपाला, बाजरी, गहू, मका, कलिंगड |
| राजगड | 07 | 29 | 03 | कांदा, भाजीपाला, ज्वारी, आंबा |
| हवेली | 10 | 112 | 54 | कांदा, भाजीपाला, ज्वारी, आंबा |
बारामतीमध्ये १२ गावे बाधित झाली असून ,२८१ लाभार्थी संख्या आहे. बारामतीमध्ये कांदा, भाजीपाला, फळपिके, डाळिंब या पिकांवर परिणाम झाला आहे. एकूण पुणे जिल्हात १२७ गावे बाधित झाली असून ,४४९८ लाभार्थी हे २३५७ हेक्टरीमध्ये आहेत.






